युपीमध्ये शिक्षा मित्रांच्या मानधनात दुप्पटीने वाढ!

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
लखनौ,
Double increase in honorarium of Shiksha Mitra उत्तर प्रदेश सरकारने आपल्या शिक्षा मित्रांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, शिक्षा मित्रांना एप्रिलपासून मासिक १८,००० रुपये मानधन मिळेल. यापूर्वी त्यांना १०,००० रुपये मासिक देण्यात येत होते. तसेच, आता त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध होतील. राज्यात सुमारे १,५०,००० शिक्षा मित्र कार्यरत आहेत, जे सर्व कंत्राटावर काम करतात. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या पगारात सुमारे ८० टक्के वाढ झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की, पूर्वी तुम्ही शिक्षण मित्र आणि प्रशिक्षकांना फक्त ३,००० रुपये देत होता. आम्ही त्याची रक्कम वाढवून १०,००० केली आणि आता एप्रिलपासून १८,००० रुपये मिळणार आहेत.
 
 
Shiksha Mitra
याशिवाय प्रशिक्षकांसाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सुमारे २८,००० प्रशिक्षक कार्यरत असून त्यांना आता मासिक १७,००० रुपये मानधन मिळेल. तसेच या रकमेचे तात्काळ वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनात समाजवादी पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या मानधनाचा मुद्दा उचलला होता. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि आमदार रागिनी सोनकर यांनी अनेकदा या विषयावर सरकारवर दबाव टाकला होता.