सोलापूर
Impersonating student in 10th standard exam सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत गंभीर घोटाळा समोर आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे मराठी पेपरसाठी परीक्षा सुरू असताना चक्क दहा तोतया विद्यार्थी आढळून आले. यामध्ये नऊ विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश होता. या विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवेढ्यातील सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासली असता हे तोतया विद्यार्थी उघडकीस आले. केंद्र प्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार दहा विद्यार्थ्यांवर कारवाई करत पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती केंद्रसंचालक विठ्ठल एकमल्ली यांनी दिली.

बीड जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाचा कारभार वारंवार चर्चा विषय ठरतोय. २०२१ साली आजारपणामुळे निधन झालेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी दिल्याचे आढळले. गटशिक्षण अधिकारी समंदरखान यांनी ऑर्डर इश्यू केली होती, परंतु बैठे पथकात पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव येणे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा काळात समस्या निर्माण होत आहेत. बीड जिल्ह्यातील कॉपीच्या घटना आधीच चर्चेत असताना, आता मंगळवेढ्यातील तोतया विद्यार्थ्यांचा प्रकार समोर आल्याने प्रश्न अजून उभा राहिला आहे.