हजारो भाविकांनी घेतले मार्कंडेश्‍वराच्या पालखीचे दर्शन

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
चामोर्शी,
Markandeshwar तालुक्यातील पवित्र तीर्थस्थळ मार्कंडादेव येथे सुरू असलेल्या मार्कंडेश्‍वर यात्रेदरम्यान 19 फरवरी रोजी समारोपीय महापूजा करुन श्री मार्कंडेश्‍वराची पालखी काढण्यात आली. त्यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
 

Markandeshwar, Markandeshwar Temple 
मार्कडेश्‍वर मंदिरात शिवलिंगाची समारोपीय महापूजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तालुका खरेदी विकी संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई शिखर संस्थेचे संचालक अतुल गण्यारपवार व त्यांच्या अर्धंगिनी साधना गण्यारपवार, नगरसेवक तथा संचालक अमोल गण्यारपवार, शितल गण्यारपवार, अजिंक्य अतुल गण्यारपवार, वैष्णवी गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मार्कंडेश्‍वराची शोभायात्रा आणि पालखीची पूजा-अर्चा करून दुपारी 3.5 वाजता वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांसह गौरीपुर येथील मतुवा महासंघ भजन मंडळ 76 व गडचिरोलीतील श्री साई बँड पार्टी यांच्या गजरात पालखी मार्कंडेश्‍वर देवस्थान परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर भाविकांना मार्कंडेश्‍वराचे दर्शन घेता यावे म्हणून पालखी संपूर्ण यात्रेतून फिरवून पालखीचा समारोप मार्कडेश्‍वर देवस्थान ट्रस्ट येथे करण्यात आला.
त्रिपुर लावल्यानंतर मार्कडेश्‍वराची निघणारी पालखी महत्वाची मानली जाते. जे भाविक त्रिपुरच्या दिवशी उपस्थित राहू शकले नाही, ते भाविक मार्कंडेश्‍वराच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता पुन्हा चार दिवस यात्रा चालू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून भाविक मार्कंडेश्‍वराच्या दर्शनासाठी येत आहेत. यात्रेतील उत्साह अद्यापही कायम आहे. मनोरंजनाची साधने यात्रेत आली असल्याने भाविकांची गर्दी रात्री 12 पर्यंत दिसून येत आहे.
पालखी शोभायात्रेत मार्कंडेश्‍वर ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामुजी पा. तीवाडे, बालस्वामी पिपरे महाराज, कालिदास बन्सोड, गजानन बारसागडे, जयराम चलाख, रामप्रसाद महाराज, मराठा धर्म शाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडूकवार, रामू महाराज गायकवाड, पंकज पांडे, श्रीकांत महाराज पांडे, मनोज हेजिब, राम राऊत, मुक्तेश्‍वर मुनघाटे, लालाजी निमडर, हरिहर कुंभारे आदी उपस्थित होते.
पालखी दरम्यान भाविकांनी मोठी गर्दी केली होती व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखीसाठी श्री मार्कंडेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.