हिंगणघाटमध्ये आढळले प्राचीन यादवकालीन दगडी खांबाचे अवशेष

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
हिंगणघाट,
ancient stone pillars वणा नदीच्या परिसरानंतर येथे वस्तीला सुरूवात होते. शहराचे या शेवटच्या टोकावर बाराव्या शतकातील यादव शैलीतील मंदिराचे दगडी खांब आढळून आले आहे. या खांबाची ओळख मूर्ती अभ्यासक पंचशील थूल, प्रवीण कडू यांनी केली आहे. शहरातील जुन्या प्राचीन मंदिराचा अभ्यास करण्यासाठी नदी काठावरील देवळांना भेटी देत असताना पंचशील थूल यांचे बाहेर खुल्यात पडून असलेल्या या दगडांकडे लक्ष गेले.
 

यादव कालीन अवशेष  
 
 
या दगडाची कोरलेली नक्षी नीट तपासून पाहिली तेव्हा हे दगड बाराव्या शतकातील यादव शैलीतील असल्याची माहिती पंचशील यांनी दिली. हे शिल्प स्थानिक स्तरावर आढळणार्‍या काळ्या (बेसाल्ट) दगडावर कोरलेले असून हा दगड अत्यंत कठीण असतो. त्यावर सुबक कमळाचे फुल कोरलेले दिसत आहे. हे भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्रात मांगल्याचे प्रतीक मानल्या जाते. दुसरा अवशेष हे मंदिराचा अधिष्ठानाचा किंवा स्तंभाचा भाग असू शकतो. यादव काळातील हेमाडपंथी शैलीत अशा प्रकारचे कोरीव काम १२ व्या किंवा १३ व्या शतकात मंदिरांमध्ये दिसून येते.
सदर माहितीच्या आधारे निसर्गसाथी व ऐतिहासिक ग्रुपतर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देऊन या दगडी खांबाचे अवशेष ताब्यात घेऊन यांना सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. हिंगणघाट येथे प्राचीन काळापासून नदीजवळ प्राचीन मंदिरे होती. या मंदिरांची साक्ष हे दगडी अवशेष देत आहेत.ancient stone pillars यादव काळात हिंगणघाट हे अत्यंत समृद्ध शहर होते. हिंगणघाट हे प्राचीन शहर आहे, याची साक्ष या दगडी अवशेषावरून झाली असल्याची माहिती प्रवीण कडू यांनी दिली आहे.