बीड,
Tehsildar arrested in Beed बीडच्या परळी तालुक्यातील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना शेतकऱ्याकडून लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारीनुसार, शेतकऱ्याकडून सोलंसी प्रमाणपत्रासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, परंतु तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर करार झाला.
एसीबीच्या पथकाने उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना पैसे स्वीकारताना पकडले. लाच घेताना तहसीलदारांनी सुरुवातीला थोडी टाळाटाळ केली, मात्र नंतर पैसे स्वीकारण्यात आले. या कारवाईमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, बीड एसीबी पुढील तपास करत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कठोर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.