गोंदिया,
Operation Muskan, जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या दोन तासांत शोध लावून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. 13 फेब्रुवारी रोजी हरवलेल्या 14 वर्षीय मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले.
नवेगावबांध पोलिस स्टेशन हद्दीतील 14 वर्षे 7 महिने वयाची मुलगी 13 फेब्रुवारीच्या सायंकाळी दुकानात सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी चिंतेतून पोलिसांकडे धाव घेतली. अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार मिळताच पोलिस निरीक्षक अजित पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. अल्पावधीतच पोलिसांनी मुलीचा माग काढत तिला ब्रह्मपुरी येथून सुखरूप ताब्यात घेतले. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम या कारवाईतून दिसून आला आहे. गोंदिया पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल भोसले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.