भिंड-ग्वाल्हेर महामार्गावर अपघातात पटवारीसह पाच ठार

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
ग्वाल्हेर,
Accident on Bhind-Gwalior highway मध्य प्रदेशमधील भिंड-ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१९ वर भीषण अपघात घडून एका पटवारीसह पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. गोहाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिमका गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे अडीच वाजता हा अपघात झाला. माहितीनुसार, लग्नसमारंभ आटोपून प्रवासी उतरविल्यानंतर एक रिकामी बस ग्वाल्हेरकडे परतत होती, तर प्रवाशांनी भरलेली चारचाकी गाडी ग्वाल्हेरहून भिंडकडे येत होती. छिमका गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आणि चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ग्वाल्हेर येथे हलविण्यात आले आहे.
 
 
 
Accident on Bhind-Gwalior highway
मृतांपैकी जगदीश भदौरिया यांची ओळख पटली असून ते भिंड येथील रहिवासी आणि कार्यरत पटवारी होते. ते माजी सैनिकही होते. अतुल शिवहरे यांचाही मृतांमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. इतर मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे चौकशी केली असता संबंधित चारचाकी गाडी मालकाने ती विकल्याचे सांगितले असून सध्या त्या वाहनधारकाचा दूरध्वनी बंद असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१९ वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून जीवितहानीच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीही याच परिसरात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. तरीदेखील ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. महामार्गाचे रुंदीकरण, सुरक्षितता साधने आणि आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उभाराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.