बाबर चौथ्या क्रमांकावर कशाला?

आफ्रिदीचा संघ व्यवस्थापनावर थेट निशाणा

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Afridi targets team management टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघरचनेवरून नवी चर्चा रंगली आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासा मैदानावर होणाऱ्या या लढतीआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने कर्णधार बाबर आझम याच्या फलंदाजी क्रमाबाबत स्पष्ट मत व्यक्त करत संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत बोलताना आफ्रिदी म्हणाला की बाबरने डावाची सुरुवात करणे संघाच्या हिताचे ठरेल. स्पर्धेला जाताना जर बाबर चौथ्या क्रमांकावर खेळेल, असा ठाम निर्णय आधीच घेतला असेल तर तो संघाच्या दृष्टीने चुकीचा विचार ठरू शकतो, असे त्याचे मत होते. प्रतिस्पर्धी संघ, खेळपट्टीची स्थिती आणि सामन्याची गरज लक्षात घेऊन अंतिम संघरचना ठरवली पाहिजे, असेही त्याने नमूद केले.
 
 
Afridi targets team
 
सलामीवीर सैम अयुब याच्या कामगिरीबाबत बोलताना आफ्रिदीने त्याच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या अनेक सामन्यांत त्याला मोठी खेळी करता आलेली नाही, असे सांगत जर एखादा खेळाडू सातत्याने धावा करू शकत नसेल तर पर्यायांचा विचार करणे आवश्यक असते, असे तो म्हणाला. बाबर हा अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू असून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असेही त्याने अधोरेखित केले. सध्याच्या स्पर्धेत अयुबने काही सामन्यांत सुरुवात केली असली तरी त्याला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळे पुढील महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी फलंदाजी क्रमात बदल करावा का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानने पुढील फेरी गाठली असली तरी न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या सामन्यांत ठोस कामगिरी करणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. अशा पार्श्वभूमीवर आफ्रिदीच्या वक्तव्याने संघातील धोरणांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.