नवी दिल्ली,
Bangalore-Goa journey देशाच्या उच्च-गती रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराचा भाग म्हणून, रेल्वे मंत्रालयाने बेंगळुरू आणि गोवा दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, ही ट्रेन बेंगळुरूच्या यशवंतपूर स्थानकावरून निघून गोव्याच्या मडगाव स्थानकावर फक्त १३ तासांत पोहोचेल. ट्रेन मंगळुरू मार्गे धावणार असल्याने किनारी भागातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, यशवंतपूरहून सकाळी ६:०५ वाजता निघणारी ही ट्रेन संध्याकाळी ७:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, मडगावहून सकाळी ५:३० वाजता निघणारी ट्रेन संध्याकाळी ६:४० वाजता यशवंतपूरला पोहोचेल. या वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिवसभर आरामदायी आणि जलद प्रवासाचा पर्याय मिळेल. तपशीलवार माहिती अशी की, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी ही ट्रेन मंगळुरू जंक्शन आणि मंगळुरू सेंट्रलवर थांबत नाही, पडिल बायपास मार्गाने ती धावणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, रेल्वे कालावधी कमी करणे आणि कामकाज अधिक कार्यक्षम करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वे काही विभागांवर कमाल वेग मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. चिक्काबनावरा आणि हसन दरम्यानचा वेग ११० किमी/तास वरून १३० किमी/तास होईल. तसेच सकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड घाट विभागातील वेग मर्यादा ३० किमी/तास वरून ४० किमी/तास करण्यात येणार आहे. या बदलांमुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी गुजरात आणि राजस्थान दरम्यान असारवा-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली असून, १८ फेब्रुवारीपासून नियमितपणे धावते. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आसने, स्वयंचलित दरवाजे, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, बायो-टॉयलेट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी ही ट्रेन विशेष डिझाइन केली आहे.