विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता चिंताजनक

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
वेध
नीलेश जोशी
addict students एकीकडे जगात सर्वाधिक तरुणाई आपल्या देशात असल्याचा अभिमान बाळगत असतानाच दुसरीकडे उद्याचे भविष्य म्हणविल्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनतेची समस्या चिंताजनक आहे. यासंदर्भात प्रचार माध्यमातून समोर येणारे काही वृत्त हे मतिगुंग करणारे आहेत. छत्तीसगढ राज्यातील धमतरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत तब्बल 35 मुलांनी मनगटावर ब्लेड मारून स्वतःला जखमी करून घेतले. या घटनेने तेथे एकच खळबळ उडाली. शासकीय यंत्रणा या संदर्भात तपास करीत आहे. याबाबत येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांनी हा प्रकार ड्रग्ज सेवनाच्या प्रभावाखाली येऊन केला असावा, असा संशय व्यक्त केला आणि पुन्हा शालेय विद्यार्थ्यामधील व्यसनाधीतनेची चर्चा सुरू झाली. ही घटना छत्तीसगढ राज्यातील असली, तरी देशात सर्वदूर ही समस्या आहे. गत ऑगस्ट महिन्यात पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या शाळेत असाच प्रकार उघडकीस आला होता. चौथी ते सातव्या इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चॉकलेटच्या माध्यमातून अमली पदार्थ पोहोचविल्या जात असल्याचे तेव्हा उघडकीस आले होते. या गंभीर समस्येची व्याप्ती निश्चितच मोठी आहे. त्याच्या मुळाशी जाऊन व्यसनाधीनतेचे निर्मूलन करणे अत्यावश्यक आहे.
 
 
 
smoking
 
 
कारण देशाचे भविष्य असणारी पुढची पिढीच संकटात आहे. ही समस्या केवळ शहरापुरती मर्यादित नाही; ग्रामीण भागातही ती झपाट्याने वाढताना दिसते. शाळेच्या गणवेशात असलेली मुले जर शाळेच्या बाहेर सिगारेट ओढताना किंवा गुटखा खाताना दिसली, तर तो समाजासाठी निश्चितच धोक्याचा इशारा म्हणावा लागेल.
 
शाळकरी विद्यार्थ्यामधील व्यसनांच्या विळख्याची आकडेवारी धक्कादायक आहे. गत काळात एका सामाजिक संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात 10-14 वयोगटातील सुमारे दोन कोटी शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे समोर आले. याच सर्वेक्षणानुसार तब्बल साडेपाच हजार विद्यार्थी दररोज या व्यसनाला बळी पडतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाèयांचे प्रमाण सुमारे साडेआठ टक्के आहे. सातवा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच 11.4 टक्के मुले धूम्रपान करतात तर 24 टक्के तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी जातात. आतातर तंबाखूपेक्षा धोकादायक असणाèया अमली पदार्थाचे सेवन करण्याचे आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. सिगारेट, हुक्का पार्लर, ई-सिगारेट हा तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाèयांसाठी प्रतिष्ठेचे ठरत आहे. यात मुलांसोबतच मुलींची संख्या चिंताजनक असल्याचे दिसून येते.
 
खरं म्हणजे या आणि अशा प्रकारच्या अनेक समस्यांना बदलती कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. समाजामध्ये ‘मी आणि माझे’ हा बळावत असलेला संकुचित विचार, स्वकेंद्रित मानसिकता, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि भौतिक सुखांचा हव्यास यामुळे आपल्या संस्कृतीचे बलस्थान असलेली कुटुंब व्यवस्था गतीने बदलत आहे आणि या नकोशा बदलामुळे नवनवीन समस्या सामोरे येत आहे.addict students वास्तविक कुटुंब व्यवस्थेतून होणारी जीवनमूल्यांची रुजवण, नकळत मिळणारे संस्कार चारित्र्यसंपन्न पिढी घडविते. याच संस्कारांचे प्रतिबिंब समाजात वावरताना उमटते. दुर्दैवाने कुटुंब व्यवस्थेची, त्यातून मिळणाऱ्या संस्कारांची वीण सैल होत असल्याचे चित्र आहे.
 
या समस्येवर केवळ चर्चा करून व केवळ विचार व्यक्त करून उपाय मिळणार नाही. त्यासाठी आपल्या सर्व परिवारांना, समाजातल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी व विशेषत: आई-वडिलांनी आपल्या पूर्वापार परंपरा, रूढी, सणोत्सव यांना प्राधान्य दिले पाहिजे. आपले पूर्वीचे जीवन जसे बाळबोध म्हटले जात होते ते संस्काराचे केंद्र होते. यातून जी पिढी तेव्हा पुढे आली तेव्हा त्यात महान विचारक, समाजसेवक असे अनेक क्षेत्रातील धुरिण निर्माण झालेत. घराघरांतून होणारे संस्कार लुप्त झाल्याने व्यसनाधीनतेसह अनेक समस्या निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी कुटुंब व्यवस्था पुन्हा संस्कार आणि संवादक्षम व्हावी.
 
9422862484