आता पालकांना सांगितल्याशिवाय विवाह नोंदणी नाही!

गुजरात सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
गुजरात,
Important decision of Gujarat government गुजरातमध्ये विवाह नोंदणीच्या नियमांत बदल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली असून या प्रस्तावामुळे लग्न नोंदणी प्रक्रियेत पालकांना माहिती देणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. या बदलांचा उद्देश विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर करून गैरप्रकारांना आळा घालणे हा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी या प्रस्तावित दुरुस्त्यांची गरज स्पष्ट करताना काही घटक सध्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. निरपराध मुलींना फसवून विवाह नोंदणी केल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी नोंदणी प्रक्रियेत अधिक काटेकोर तरतुदी आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील विविध व्यक्ती आणि संघटनांकडूनही नियम कडक करण्याची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला.
 
 

 Gujarat government marriage 
नव्या मसुद्यानुसार विवाह नोंदणीसाठी अर्ज करताना वधू-वरांनी आपल्या पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचे जाहीर करणे आवश्यक राहील. अर्जासोबत पालकांची नावे, पत्ते आणि संपर्क तपशील देणे बंधनकारक केले जाईल. सहाय्यक निबंधक अर्जाची छाननी करून संबंधित पालकांना निश्चित कालावधीत सूचना पाठवतील. त्यानंतर सर्व अटी पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर ठरावीक दिवसांनी विवाह नोंदणीची अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवली जाईल, अशी तरतूदही प्रस्तावित आहे.
 
या बदलांबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून ठरावीक कालावधीत त्या सादर करता येणार आहेत. प्राप्त सूचना आणि आक्षेपांचा विचार करूनच अंतिम नियम लागू करण्यात येतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या विषयावर सभागृहात चर्चा रंगली. काही सदस्यांनी प्रस्तावित दुरुस्त्या काळाची गरज असल्याचे सांगत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. एकूणच, विवाह नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा बदल ठरू शकतो, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.