भांडगाव
Khor Daund burglary, येथील डोंबेवाडी परिसरातील ढोरजे वस्तीवर रविवारी मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली. ज्ञानेश्वर बबन डोंबे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट, तुळजापूर आणि सोनोरी येथे देवदर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने-चांदी व रोख रक्कम लंपास केली.
रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ज्ञानेश्वर डोंबे घर परतले तेव्हा घरासमोरील वीज बंद आणि कुलूप तुटलेले दिसल्याने चोरी उघडकीस आली. प्राथमिक माहिती नुसार, साडेसात तोळे सोने, चांदीच्या पट्ट्या आणि रोख रक्कम एकत्रित करून सुमारे १४ लाख रुपये ऐवज चोरीस गेला आहे. जुन्या पावत्यानुसार सोने पावणेसात लाख रुपयांचे होते, परंतु सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल ११ लाख २४ हजार रुपये आहे.
यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून ठसे संकलित करण्यात आले आहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत आणि संशयितांच्या शोधासाठी काम सुरू आहे.या घटनेमुळे खोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे की, आरोपींचा लवकरात लवकर शोध लागेल आणि योग्य कारवाई केली जाईल.घटनेमुळे स्थानिकांमध्ये सुरक्षा आणि घरफोडीविरोधात चिंता वाढली असून, पोलिस तपासाची गती आता परिसराच्या शांतीसाठी महत्त्वाची ठरत आहे.