गोंदिया,
Nagpur Raipur train delay, नागपूर ते रायपूर आणि रायपूर ते नागपूर दरम्यान धावणार्या एक्स्प्रेस, सुपरफास्ट व लोकल रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णपणे कोलमडले आहे. तासन्तास विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रेल्वे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत गोंदिया हे महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. नागपूर-रायपूर मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या गोंदिया मार्गे धावतात. तरीही मागील पंधरा दिवसांपासून या मार्गावरील बहुतांश गाड्या दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. रायपूरकडून गोंदियाकडे येणार्या प्रवासी गाड्यांना आमगावनंतर गुदमा परिसरात थांबवून मालगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. चार-पाच मालगाड्या सोडल्यानंतरच प्रवासी गाड्यांना मार्ग दिला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. नागपूरकडून येणार्या गाड्यांचीही अशीच अवस्था असून मुंडीकोटा, काचेवानी व गंगाझरी येथे आउटरवर गाड्या अडकविल्या जात आहेत. दररोज नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी प्रवास करणार्या नागरिकांची त्यामुळे अक्षरशः परवड होत आहे. कोणतीही पूर्वसूचना, अधिकृत स्पष्टीकरण किंवा विलंबाचे ठोस कारण दिले जात नसल्याने प्रवाशांचा संताप वाढत आहे. शनिवार 21 फेब्रुवारीला गोंदिया स्थानकावर सकाळी 11.15 वाजता पोहोचणारी विदर्भ एक्स्प्रेस दुपारी सुमारे 1 वाजता पोहोचली. तुमसरनंतर या गाडीला वारंवार थांबविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी नागपूरच्या दिशेने धावणार्या अहमदाबाद एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच इतवारी-रायपूर लोकल यांसह अन्य गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. एकही गाडी नियोजित वेळेनुसार धावत नसल्याची स्थिती आहे. मालवाहतुकीला प्राधान्य देताना प्रवासी सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. परिणामी, प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा किती दिवस? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.