आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. रंजना कवाडे यांचे निधन

जयदीप कवाडे यांना मातृशोक ;आज मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Prof. Ranjana Kawade passes away आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या प्रा. रंजनाकवाडे यांचे शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून आंबेडकरवादी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या मातोश्री होत. तसेच त्या लाँग मार्चचे प्रणेते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी होत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती; मात्र आजाराशी सामना करताना त्यांनी मानसिक खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टी कायम ठेवली.
 
 
 
Prof. Ranjana Kawade passes away
प्रा. रंजना कवाडे यांनी केवळ कुटुंबीयांच्या राजकीय वारशावर न राहता स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीबरोबरच रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महिला सक्षमीकरण, युवकांना मार्गदर्शन आणि आंबेडकरवादी विचारांची रुजवण यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात मुलगा जयदीप, मुली वैशाली व सुजाता, सून प्रतिमा, नाती निरिजा व अस्मिता तसेच अन्य नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी साडेचार वाजता नागपुरातील लक्ष्मीनगर येथील निवासस्थानातून निघून मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कारासाठी जाणार आहे.