सुलतानपूर,
Protest in Sultanpur सुलतानपूर येथे २१ फेब्रुवारी रोजी चिखला काकड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. २० फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेच्या कार्यक्रमावेळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून कुमारी संजीवनी वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या गटाकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकाराचा चित्रफीत स्वरूपातील प्रसार समाजमाध्यमांवर झाल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर दिलीप विश्वनाथ वाघ यांनी सुलतानपूर येथे जाहीर निषेध आंदोलन छेडले. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच २२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. चिखला काकड येथे सर्व हिंदू तसेच मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. घटनेतील सरपंच गणेश काकड यांच्यासह सर्व आरोपींना बारा तासांच्या आत अटक करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव चेके, शिवप्रसाद जोगदंड, समाधान ठाकरे, परमेश्वर दहातोंडे, सुरेश सुरूशे यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.