पुणे,
Pune Hadapsar fire पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून 19 मजूर कुटुंबांची पत्रा-बांबूच्या शेडची झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडली नाही.
आगीची सुरूवात लोही गार्डन शेजारील मगरपट्टा चौकाजवळील भोरी पडळ भागात रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार, काही अज्ञात मुलांनी मोटरसायकल पेटवली, ज्यामुळे दुचाकीचा स्फोट होऊन शेजारील पत्र्याच्या झोपड्यांना आग लागली. घरातील लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बाहेर काढले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.पुणे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हडपसर अग्निशमन केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे आणि प्रभारी अधिकारी विलास धडस यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अग्निशमन वाहनांच्या साहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली.
या आगीत मजूर कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून 19 कुटुंबांची झोपडी, संसारोपयोगी वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि तीन दुचाकी जळून खाक झाली. या कुटुंबांची उदरनिर्वाह बिगारी कामावर अवलंबून होता आणि आता त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे.स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून आग लावणाऱ्या अज्ञात मुलांचा शोध सुरू असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांच्या तपासानुसार या घटनेतील जबाबदार व्यक्तींना ओळखून योग्य ती कारवाई केली जाईल.या दुर्घटनेने हडपसर परिसरातील मजूर कुटुंबांमध्ये भयंकर हाहाकार निर्माण झाला असून, स्थानिक समाज आणि प्रशासनाची मदत आता अत्यावश्यक ठरली आहे.