अकोल्यातील दोन आमदारांना बिश्नोई टोळींच्या धमक्या

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
अकोला,
Threats to two MLAs from Akola बॉलिवूडमधील काही व्यक्तींना धमक्या दिल्यानंतर आता बिश्नोई गटाकडून राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील दोन आमदारांना दूरध्वनीवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना दूरध्वनीवरून दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ठरलेली रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. स्वतःच्या सुरक्षेसाठी त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचेही समजते.
 
 
बिश्नोई
  
याचबरोबर अकोट मतदारसंघाचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या शेजाऱ्यालाही धमकीचा दूरध्वनी आल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणांमध्ये स्वतःला बिश्नोई गटाशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधल्याचे समोर आले आहे. शुभम लोणकर असे नाव सांगून धमकी देण्यात आल्याची नोंद आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून मुंबई गुन्हे शाखाही तपासात सहभागी झाल्याचे कळते. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणाच्या तपासातही काही नवे धागेदोरे समोर आले आहेत. शुभम लोणकरसोबत आरजू बिश्नोई या नावाचाही तपासात उल्लेख झाला असून दोघांना शोधण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत आहेत. या घडामोडींमुळे राजकीय तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.