वडनेर,
Wadner illegal gambling सुर्यास्तापासून सूर्योदय ते मध्यरात्री पर्यंत येथे एकच ध्यास. तो म्हणजे श्रीदेवी संग मिलन, कल्याण, खजाना वगैरे. वडनेर गावात चालणार्या ऑनलाइन तसेच सट्टा मटका अड्डा. पोलिसांच्या साक्षीने हा व्यवसाय अगदी एका बँकेच्या शेजारी कॉम्प्लेसमध्ये खुलेआम सुरू आहे. परिणामी, गावकर्यांत संतापाची लाट उसळली आहे.
सकाळी सूर्य उगवतो तेव्हा जंगलातील हरणाच्या डोयात पहिला विचार असतो की, आपल्याला आज वाघापेक्षा जास्त वेगाने धावावे लागेल. नाही तर आपली शिकार होईल. अगदी त्याच वेळेला वाघाच्या डोयातही पहिला विचार असतो. आज आपल्याला हरणापेक्षा जास्त वेगाने धावा लागेल. नाहीतर आपल्याला उपाशी राहावे लागेल. प्रश्न तेवढा वाघाचा आणि हरणाचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे. पोलिस आणि अवैध व्यावसायिक या शर्यतीप्रमाणे नागरिकांच्या जीविताशी केवळ मिळणार्या लाखो रुपयांसाठी खेळ करीत आहे. पोलिसांच्या साक्षीने हा एवढा भयंकर प्रकार वरिष्ठांच्या नाकावर टिचून सुरू आहे. शासन व्यवस्थेत वरिष्ठ अधिकारी हे वाघाचे रूप असून या प्रकाराकडे दुर्लक्ष का? हा सुज्ञ नागरिकांचा प्रश्न आहे.
हिंगणघाट तालुयातील वडनेर हे सर्वात मोठे गाव आहे. गावात पोलिस ठाणे ब्रिटिशकालीन काळापासून आहे. वडनेर पोलिस ठाणे महामार्गावर असल्यामुळे येथे संबंधित अधिकार्यांचे चांगलेच फावते आहे. अगदी वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले या पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठांचा कधीही वचक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येथील पोलिस प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंदे सुरू असतात.
वडनेर येथे महामार्गाच्या बाजूला बायपास रोडवर एका कॉम्प्लेसमध्ये बँकेच्या शेजारी दिवसरात्र सट्टापट्टी व्यवसाय सुरू असून सटोड्यांची जणू जत्राच भरते. मात्र, याच रस्त्याने विविध कामासाठी बँक, ग्रामीण रुग्णालय, महसूल, कृषी विभाग या कार्यालयांकडे जाणार्या नागरिकांचा तसेच गावातील शेतकरी, शेतमजूरांचा हा मार्ग असल्याने आवागमन करणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ऑनलाइन सट्टा बाजार तसेच सट्टा वरली मटका हा व्यवसाय खुलेआम सुरू असून गावातील वयस्क, तरुण मंडळी या मार्गी लागून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. उद्ध्वस्त झालेल्या अनेकांनी या धंद्यात बरबाद झालेल्या मंडळींनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. खुली परवानगी मिळत असल्याने पोलिसांना मिळणार्या लाखो रुपयांच्या मोबदल्यामुळे या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात अनेक बळी जात आहे. कोणत्याही अवैध धंद्यांना आजपर्यंत आळा लागला नसून सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.