वर्धा,
Wardha tree cutting controversy देशात वृक्षारोपनाची चळवळ दिवसेंदिवस प्रबळ होते. शासन, प्रशासनासह विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनाही वृक्षारोपनाची चळवळ मोठ्या उत्साहाने राबवतात. परंत, वर्धेतील आरती चौक ते धुनिवाले चौक दरम्यान महाकाय वृक्ष सडल्याच्या कारणाहून नगर पालिकेने ते शिवजयंतीच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी तोडण्याचे पुण्यकर्म केले.
शहर झपाट्याने पसरत चालले असल्याने तसाच विकासही चौफेर उधळतो आहे. अगदी नगर पालिकेने सायकल ट्र्याकची निर्मिती करण्यासाठी निविदा काढल्या. त्यात विशिष्ट पट्टीचे निकष लावण्यात आले असताना चक पेन्टने सायकल ट्रॅ्याकची निर्मिती करण्यात आली. असे अनेक विकास कामं सुरू आहे. शहरातील आरती चौक ते दत्तपूर टी पॉईन्टपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यावेळी या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले महाकाय वृक्ष तोडण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. त्यावेळी वर्धेतील विविध सामाजिक संघटना, वृक्षप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेत महाकाय डेरेदार शेकडो वृक्ष वाचवले. या प्रकरणी सार्वजनिक विभागाच्या वतीने वरिष्ठ अधिकार्यांची समितीही नेमण्यात आली होती. समिती, वर्धेकर आणि विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या अभ्यासानंतर ती सरसगट वृक्ष तोड थांबवण्यात आली. त्यामुळे आजही आरती चौक ते दत्तपूर टी पॉईन्टपर्यंत कडूनिंबाचे
मोठ्ठाले झाडं उभी आहेत. या वृक्षांचा काही मोठ्या व्यवसायिकांना त्रासही होतो. एका वयाचे एक सारखे हिरवीकंच झाडं आरती चौक ते धुनिवाले चौकापर्यंत उभी असताना या मार्गावरील हरिसन्स होंडा या शोरूम पुढील झाड काल गुरुवारी शिवाजी महाराज जयंतीची शासकीय सुट्टी असताना सकाळी ८ वाजताच्या सुमारास तोडून मोकळे केले. या संदर्भात त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नगर पालिका कर्मचार्याकडे विचारणा केली असता ते झाड पोखरून सडले असल्याची तक्रार होती. त्या तक्रारीवरून झाड तोडल्याचे नगर पालिका कर्मचार्याने सांगितले. शासकीय सुट्टीच्या दिवशी कर्मचारी आवश्यक काम करण्यासाठीही मागेपुढे पाहत असताना शिवाजी महाराज जयंतीलाच त्या झाडाचा फडश्या पाडल्याने परिसरात आश्चर्य व्यत करण्यात येत होते. या परिसरात दुचाकी गाड्यांचे शोरूम आहे. त्यांना बाहेरून नवीन दुचाकी घेऊन येणारे ट्रक उभे करण्यासाठी त्या झाडाचा त्रास तर होत नव्हता ना असा प्रश्नही वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे.