‌‘लाल साम्राज्या‌’चा अखेरचा बुरूज ढासळला

नक्षल्यांचा सर्वोच्च नेता देवजीचे आत्मसमर्पण

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
गडचिरोली, 22 फेब्रुवारी
naxalite-devji देशातील नक्षली चळवळीचा कणा समजला जाणारा आणि सुरक्षा यंत्रणांच्या हिटलिस्टवर असलेला सर्वोच्च जहाल नक्षलवादी नेता आणि नक्षली संघटनेचा महासचिव थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी याने सीसीएम सदस्य संग्राम याच्यासह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षली चळवळीच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आत्मसर्पण मानले जात आहे.
नक्षल्यांचा सर्वोच्च नेता बसवाराजूच्या खात्म्यानंतर लाल साम्राज्याची संपूर्ण सूत्रे देवजीच्या हातात आली होती. छत्तीसगडमध्ये त्याच्यावर दीड कोटी रुपयांचे बक्षीस आहे तर संग्रामवर 1 कोटी रुपयांचे बक्षीस आहे. गेल्या चार दशकांपासून देवजी पोलिसांना गुंगारा देत होता. तो नक्षली चळवळीतील कारवायांचा मास्टरमाईंड मानला जातो. मात्र, आता ढासळत्या प्रकृतीमुळे आणि संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे तो शरण आल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
 
naxalite-devji
 
कोण आहे देवजी?
naxalite-devji देवजी हा नक्षलवादी संघटनेच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असून तो चळवळींचा मुख्य रणनीतीकार मानला जातो. नक्षलवाद्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क, शस्त्रास्त्रांची रसद आणि मोठ्या हल्ल्यांचे नियोजन त्याच्याच इशाऱ्यावर होत असे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्याने नक्षल्यांच्या आगामी घातपाती कारवायांचा बुरूज आपोआपच ढासळला आहे.