विनयभंग प्रकरणी आरोपीस ६ वर्ष सश्रम कारावास

    दिनांक :22-Feb-2026
Total Views |
जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयाचा निकाल
 
वाशीम, 
Molestation case घरी कोणीही नसल्याची संधी साधत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस येथील जिल्हा अतिरीक्त व सत्र न्यायाधीश एम. एस. सहस्त्रबुध्दे यांनी २० फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात पोक्सो अंतर्गत ६ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रिसोड शहरात २१ जानेवारी २०२२ रोजी ही संतापजनक घटना घडली होती.
 

vinay
 
घरातील आई, बाबा व भाऊ कामानिमित्त बाहेर गेले असता ज्ञानेश्वर सखाराम पोधाडे हा घरात शिरला. घरी कोणी आहे का? असे विचारले असता सदर अल्पवयीन मुलीने आई बाबा घरी नसल्याचे सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर पोधाडे याने सदर मुलीस पिण्यास पाणी आणण्याचे सांगितले. तीने पाण्याचा ग्लास आणला असता त्याने या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली व तीने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी घरातील बाजुच्या रुममध्ये टिव्ही पाहत असलेला तीचा भाऊ धावत आला. तसेच घरा शेजारी असलेले लोक सुध्दा धावत तेथे आले. यामुळे ज्ञानेश्वर पोधाडे याने बसून दुचाकीवर घटनास्थळावरून पळ काढला. या गंभीर प्रकारानंतर पिडीत मुलीचे आई वडील घरी आले. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीने आई वडीलांना सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर पिडीत मुलीने वडीला सोबत पोलिस स्टेशन गाठुन आरोपी ज्ञानेश्वर पोधाडे विरुध्द फिर्याद दाखल केली.
 
 
Molestation case  या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द तत्कालीन भारतीय दंड विधानाचे कलम ३५४, ४५२, सह कलम ९ (एन) पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक महेंद्र प्रकाश गवई यांनी पुर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा अतिरीक्त व सत्र न्यायाधीश क्र. ३ यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी व फिर्यादी पक्षाची बाजु ऐकुन घेतल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर सखाराम पोधाडे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने न्यायाधीश एम. एस. सहस्त्रबुध्दे यांनी आरोपीस कलम ९ (एन) पोक्सो मध्ये दोषी ठरवुन ६ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड दंडनभरल्यास अधिक तीन महीने कारावास तसेच कलम ४५२ मध्ये दोषी ठरवून ५ वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अधिक एक महीना कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुचिता कुळकर्णी यांनी काम पाहीले तर कोर्ट पैरवी म्हणुन राजु ढोरे यांनी काम पाहीले.