काबुल,
taliban-warns-pakistan-after-airstrike अफगानिस्तानने सीमावर्ती भागांवर पाकिस्तानने केलेल्या हवाई कारवाईची पुष्टी करत या हल्ल्यांत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, नांगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये रात्री उशिरा अचानक बॉम्बहल्ले करण्यात आले. या कारवाईत महिला आणि मुलांसह अनेक जण ठार झाल्याचे त्यांनी नमूद केले.

वृत्तानुसार, नांगरहारमध्ये एका निवासी इमारतीवर हल्ला झाला, जिथे एका कुटुंबातील सुमारे २३ सदस्य राहत होते. इमारतीचे अवशेष कोसळल्याने कुटुंबीय ढिगाऱ्याखाली अडकले असून आतापर्यंत केवळ चार जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, बेरमाल आणि आरगुन जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे हवाई हल्ले करण्यात आले. इस्लामाबादकडून मात्र या कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. taliban-warns-pakistan-after-airstrike पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल सीमेजवळील दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधल्याचे ते म्हणतात. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यासह एका जवानाचा मृत्यू झाला होता, त्याचा बदला म्हणून ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इस्लामाबादमधील शिया मशिदीवरील हल्ला तसेच बन्नूतील घटनेमागे अफगाणिस्तानस्थित गटांचा हात असल्याचे सांगितले आहे. इस्लामिक स्टेट - खोरासान प्रांत आणि तथाकथित पाकिस्तानी तालिबानशी संबंधित गटांनी या घटनांची जबाबदारी स्वीकारल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अफगाण तालिबान प्रशासनाने आपल्या भूमीचा वापर पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी होऊ न देण्याची हमी द्यावी, अशी मागणीही पाकिस्तानने पुन्हा केली आहे. taliban-warns-pakistan-after-airstrike दरम्यान, अफगाण तालिबानने पाकिस्तानवर हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संबंध अधिक ताणले गेले असून सीमावर्ती भागात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही दोन्ही बाजूंमध्ये अल्पकालीन सशस्त्र चकमक झाली होती, ज्यात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.