१० मार्चपर्यंत पैसे देण्याचे दिले आश्वासन
वर्धा,
Collector's Office कोल्हापुरी बंधार्याच्या बांधकामासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे वेळी देयक अदा न केल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने याचिकाकर्त्या कंत्राटदार एजन्सीच्या बाजूने निकाल दिला. पण, निकालानंतरही पैसे न दिल्याने पुन्हा प्रकरण न्यायालयात पोहोचले. अखेर न्यायालयाने जप्तीचा आदेश काढला. याच आदेशाच्या अंमलबजावणीसाठी चमू आज सोमवार २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकली. या प्रकरणी १० मार्चंपर्यंत पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरील आज जप्तीची कारवाई टळली.
Collector's Office समुद्रपूर तालुयातील साखरा, तळेगाव येथे बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधार्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने विविध साहित्याची खरेदी मे. दर्शन कंस्ट्रशन कंपनी वर्धा या कंत्राटदार एजन्सीकडून केली. पण, त्याचे देयक वेळीच अदा केले नाही. त्यामुळे कंत्राटदार एजन्सीने हिंगणघाट येथील न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने कंत्राटदाराच्या बाजूने निर्णय दिला. पण, न्यायालयाच्या आदेशानंतरही देयक अदा न झाल्याने पुन्हा प्रकरण न्यायालयात पोहोचले. अखेर, हिंगणघाट येथील न्यायालयाने जप्तीचा आदेश निर्गमित केला. याच आदेशान्वये जप्तीच्या कारवाईसाठी न्यायालयाचे बेलीफ सुशील मानवटकर, तक्रारदार समुद्रे आज २३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याशी चर्चा झाली. शिवाय मृद व जलसंधार विभागाच्या अधिकार्यांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठांच्या सूचनांनुसार मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ लिपीक गणेश नेहारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी भुसंपादन यांच्या दालनात चर्चा झाली. याच चर्चेत २१ लाख ९ हजार ९०९ रुपयांचे देयक १० मार्च पूर्वी अदा करण्यात येईल असे लेखी आश्वासन मृद व जलसंधारण विभागाने याचिकाकर्त्याला दिल्याने आणि त्यास याचिकाकर्त्याने होकार दर्शविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीची नामुष्की टळली.