अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
अमरावती,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत समारंभामध्ये Dr. Kamaltai Gawai डॉ. कमल रामक्रिष्ण गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत राज्यशास्त्र विषयात वाड्:मय पंडित (डी.लिट) या सर्वोच्च पदवीने मान्यवरांच्या हस्ते सोमवारी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ गौरवोद्घोषाचे वाचन करण्यात आले.
४६६ संशोधकांना आचार्य पदवी
दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय ४६६ संशोधकांना आचार्य पदवी देवून सन्मानित करण्यात आले. पदके प्राप्त करणार्यांमध्ये निकीत टिकैत या दिव्यांग विद्यार्थाचा सुध्दा समावेश होता. याप्रसंगी अधिष्ठात्यांनी पदवीकांक्षी व आचार्य पदवीकांक्षींना सादर केले. यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थांना अनुग्रह दिला.
कृत्रिम बुध्दिमत्तेशी जुळवून घ्यावे : कुलगुरू
आजचे युग हे ’एआय’ अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेचे आहे. विद्यार्थांनी या बदलांना घाबरून न जाता नवीन कौशल्ये आत्मसात करावीत. एआय हे रोजगाराची नवीन दालने उघडणारे तंत्रमित्र ठरेल, असे मत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मिलींद बारहाते यांनी अध्यक्षीय भाषण करतांना व्यक्त केले. विद्यापीठाशी सध्या ४५१ महाविद्यालये संलग्न असून सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी ४२,३१७ विद्यार्थांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाने संशोधनात मोठी झेप घेतली असून, यावर्षी प्राध्यापक आणि विद्यार्थांनी दक्षिण आफ्रिकेचे पेटंट मिळवण्यासह एकूण १२ पेटंट्सवर मोहोर उमटवली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावर सतत भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Dr. Kamaltai Gawai कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अतिथींचा परिचय करुन दातृनामावलीचे वाचन केले. संचालन डॉ. सुलभा पाटील व डॉ. प्रणव कोलते यांनी केले. पसायदानाने व राष्ट्रगीताने दीक्षांत समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई, महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एस. जामोदे, डॉ. प्रसाद वाडेगावकर, माजी कुलसचिव डॉ. वंदन मोहोड, प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. तुषार देशमुख तसेच डॉ. श्वेता मिलींद बारहाते, प्रा. स्वाती महेंद्र ढोरे व ओजस्विनी अविनाश असनारे तसेच एन.सी.सी.चे अधिकारी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सर्व सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पाचही जिल्ह्रातील गुणवत्ताधारक विद्यार्थी, आचार्य पदवीधारक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक याशिवाय शहरातील गणमान्य नागरिक मोठएा संख्येने उपस्थित होते.