धायरी
Dhayari, Pune सिंहगड रस्ता परिसरातील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लि., धायरी शाखेत एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या अधिकृत सुवर्ण मूल्यमापनकार आणि दोन कर्जदारांनी संगनमताने बँकेला तब्बल ७,४४,००० रुपयांचे नुकसान पोहचवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बँकेच्या वतीने मेघनाथ सदाशिव बोडस (वय ६३) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाचा उघडकीस आला. तक्रारीनुसार, बँकेचे सुवर्ण मूल्यमापनकार लक्ष्मण उमाजी पाटील (रा. आंबेगाव पठार) यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्जदार शशिकांत संभाजी गोदगे (रा. आंबेगाव पठार) आणि गणेश बाबासाहेब आदलिंग (रा. किरकटवाडी) यांच्यासह हातमिळवणी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, Dhayari, Pune हा गैरप्रकार २८ मार्च २०२५ ते २५ जून २०२५ या कालावधीत घडला. दि. २८ मार्च रोजी शशिकांत गोदगे यांनी बँकेत ७६ ग्रॅम ७६० मिली वजनाचे सोने तारण ठेवले. लक्ष्मण पाटील यांनी हे बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि त्यावर बँकेने ३,४४,००० रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर, १८ जून रोजी गणेश आदलिंग यांनी ८० ग्रॅम ५०० मिली वजनाचे बनावट सोने तारण ठेवले. पुन्हा मूल्यमापनकाराने ते खरे असल्याचे सांगून ४,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर केले.अशा प्रकारे एकूण १५७ ग्रॅम २६० मिली बनावट सोने बँकेकडे तारण ठेवून आरोपींनी ७,४४,००० रुपयांचे कर्ज घेतले, परंतु कर्जाची परतफेड न करता बँकेचा विश्वासघात केला.नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी. डी. सावंत तपास करीत आहेत.पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही कर्ज व्यवहारात फसवणुकीपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.