सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
रिपाइंचे तेजराव वानखेडे यांचे आठवलेंना साकडे
 
वाशीम, 
Free degree education महाराष्ट्रातील सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे, अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. वानखेडे यांनी शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयामध्ये पदवीपर्यंत व पदवित्तरचे शिक्षण सर्व समाजातील घटकांना पूर्णपणे मोफत करण्याकरिता येणार्‍या २०२६-२७ या आर्थिक अर्थसंकल्पात तरतूद करून निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना सूचना देण्यात यावी अशी मागणी केली. केरळ सरकारने विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना Free degree education पदवीपर्यंत शिक्षणाचे द्वार सर्व समाज घटकांना मोफत केले आहेत.
 
 
Athawale
 
Free degree education त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ट्युशन फीच्या चिंतेतून मुक्तता मिळण्याकरिता पदवीपर्यंत शिक्षण मोफत करावे. केवळ मोफत शिक्षणच नव्हे तर शिक्षणाचा दर्जा सुद्धा सुधारण्यासाठी सरकारने भरीव तरतुदी कराव्या, राज्यातील विद्यापीठांच्या विकास कामासाठी आणि सोयी सुविधासाठी कोट्यावधीचा निधी जाहीर करावा, उच्च शिक्षणात संशोधनाला चालना देण्यासाठी सरकारने पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व बाहेर देशामध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती जाहीर करावी, ज्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नाही त्यांना सुद्धा याचा लाभ देण्यात यावा तसेच आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बारावीनंतरचे शिक्षण सोडतात म्हणून महाराष्ट्र सरकारने पदवीपर्यंत शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेऊन हजारो पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करावे. त्याचप्रमाणे सरकारने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, जैवशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, कृषी संशोधन व फलोत्पादन, कृषी औद्योगिक या क्षेत्रात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे राहू नयेत त्यांना देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान मिळावे याचा विचार करून शैक्षणिक कार्य हाती घ्यावे व राज्याला शिक्षण क्षेत्रातील प्रगतशील राज्य म्हणून घोषित करावे इत्यादी मागण्या वानखेडे यांनी नामदर आठवले यांच्याकडे केली आहे.