अफगाण सीमेजवळ हल्ला; भारताचा पाकिस्तानवर तीव्र निषेध

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India strongly condemns Pakistan काबूलमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी सकाळी अफगाणिस्तान सीमेजवळ कारवाई करत सुमारे सत्तर अतिरेकी ठार केल्याचा दावा केला आहे. मात्र अफगाणिस्तानने हा दावा फेटाळून लावत पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या कारवाईत महिला व लहान मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अफगाण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात रमजानच्या पवित्र महिन्यात अफगाण भूमीवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करत हा प्रकार पाकिस्तानकडून स्वतःच्या अंतर्गत अपयशांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
India strongly
 
 
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की नांगरहार आणि पक्तिका या पूर्वेकडील प्रांतांतील विविध नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले. यात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आणि अनेक घरे बाधित झाल्याचा आरोप आहे. हा हल्ला अफगाण हवाई क्षेत्राचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे. सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी या कारवाईत डझनभर नागरिक ठार आणि जखमी झाल्याचे सांगत पाकिस्तानचा सत्तर अतिरेकी मारल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. नांगरहार प्रांतातील अफगाण रेड क्रेसेंट संस्थेचे स्थानिक प्रमुख मौलवी फजल रहमान फय्याज यांनी अठरा जणांचा मृत्यू झाल्याची आणि अनेक जखमी असल्याची माहिती दिली.
 
दरम्यान, बलुचिस्तानकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अफगाण नागरिकांना भाऊ-बहिणी संबोधत त्यांना पाकिस्तानशी संबंधित घटकांकडून राबविल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही व्यक्ती पश्तो भाषा बोलून स्वतःला अफगाण समाजाचा भाग असल्याचे भासवतात, परंतु ते प्रत्यक्षात पाकिस्तानशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे परिसरातील तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.