लोकआंदोलन न्यासचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
वाशीम,
’देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’ या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या प्रसिद्ध कवितेनुसार दातृत्वाचा गुण आत्मसात करणे आणि घेणार्याने देखील देणार्यासारखे मोठे व्हावे, म्हणजेच प्रेम, ज्ञान किंवा मदत केवळ घेऊ नये तर ती इतरांना देण्यास शिकावे. त्यानुसार आपल्या देशाप्रती त्याग आणि समर्पणाची भावना ठेवली तरच देश बदलेल. त्यासाठी प्रत्येकाने थोर समाजसुधारक अण्णा हजारे यांची जीवन जगण्याची पंचसुत्री आणि त्यांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन लोक आंदोलन न्यासाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा Kalpana Inamdar कल्पना इनामदार यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना केले.
Kalpana Inamdar महाराष्ट्र दौर्यादरम्यान स्थानिक विश्रामभवनात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी लोक आंदोलन न्यासाची संघटन बैठक घेण्यात आली. बैठकीला राष्ट्रीय खजिनदार दत्ता आवारी, कार्यालयीन व्यवस्थापक अन्सार शेख, वाशीम जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी, जिल्हा सचिव संदीप पिंपळकर, रिसोड तालुका अध्यक्ष प्रशांत सरनाईक, गजानन व्यवहारे, इरफान सय्यद, गोपाल खिराडे, सय्यद जाकीर, कैफ जाकीर, सुनील बुरे, किरण पडघान, सुनिता पाटील, गीता वोरा, उज्वला चौधरी, रचना मेहता, अश्विनी अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातुन जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी संघटनेची जिल्ह्यातील कार्याची सविस्तर माहिती दिली. बैठकीमध्ये संघटन बांधणी, सभासद नोंदणी आदींसह जिल्ह्यातील विविध पदाधिकार्यांची निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात दत्ता आवारे म्हणाले की, थोर समाजसुधारक अण्णा हजारे यांनी आपल्या प्रखर आंदोलनातून अनेक कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले. त्यातील माहितीचा अधिकार, बदल्यांचा कायदा, दप्तर दिरंगाई कायदा यासारखे १० प्रमुख कायदे आहेत.
Kalpana Inamdar कल्पना इनामदार म्हणाल्या की, कार्यकर्ते हेच अण्णांची ताकद आहे. त्यांनी आपल्या जीवनात पंचसुत्री अंमलात आणली. त्यामुळे ते आज वयाच्या ९१ व्या वर्षीही सकारात्मक आहेत. लोकआंदोलन न्यास म्हणजे कुणाची गळचेपी नाही, फसवणूक नाही तर व्यवस्थेला काम करावयास भाग पाडणे व कायद्याची अंमलबजावणी करणे हे होय. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा कळस हीच त्याची ओळख असते. त्याचप्रकारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हा भारत देशातील लोकशाहीच्या मंदिराचा कळस आहे. अण्णांनी आपले संपुर्ण जीवन लोकांच्या भल्यासाठी खर्ची घातले. आता अण्णा थकले आहेत. त्यामुळे अण्णांच्या विचारांचा वसा घेवून प्रत्येकाने मी अण्णा आहे हा विचार घेतला तरच समाजसुधारणा होवू शकते. नागरीकांनी आपल्या मुलभूत अधिकारासाठी जागे व्हावे. त्यासाठी स्वत:ची ताकद वाढवावी, लोक आंदोलन न्यास यासाठी सदैव तयार आहे असे त्या शेवटी म्हणाल्या. बैठकीचे सुत्रसंचालन गजानन व्यवहारे व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी यांनी मानले.