आरोपी मुलाला अटक
भिसी येथील घटना
चिमूर,
दारूचे व्यसन असणार्या वडिलांच्या शिवीगाळ व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून लहान मुलाने नायलॉन दोरीने गळा आवळून त्यांची Murder हत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास भिसी येथे घडली. वडिलाने स्वतः आत्महत्या केली असल्याचा बनाव मुलाने पोलिसांसमोर केला होता. मात्र पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. संदेश मच्छिन्द्र मेश्राम (19) असे आरोपी मुलाचे, तर मच्छिन्द्र आनंद मेश्राम (51) असे मृतक वडिलाचे नाव आहे.
तालुक्यातील भिसी येथील जुनी वस्ती परिसरात राहणार्या मच्छिन्द्र मेश्राम यांना दारूचे व्यसन होते. त्यांना दोन मुले आहे. मच्छिन्द्र हे नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होते. घटनेच्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा पंचशील मेश्राम व पत्नी बाहेरगावी होते. त्यामुळे लहान मुलगा संदेश व वडील मच्छिन्द्र हे दोघेच घरी होते. गावात साक्षगंधाचा कार्यक्रम असल्याने संदेश हा तेथे जेवण वाढण्यासाठी गेला होता. जेवण आटोपल्यावर संदेश घरी परतला. त्यावेळी वडील घरी आले नव्हते. रात्री 11 वाजता ते दारूच्या नशेत घरी आले. त्यावेळी संदेश याने मी जेवण आणले आहे करून घ्या, असे वडिलांना म्हटले. मात्र मला अजून दारू प्यायची आहे, मी पुन्हा घेऊन येतो असे म्हटल्यावर मुलाने त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली. परंतु, वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मुलाला शिवीगाळ करणे सुरु केले. त्यामुळे संदेशचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील नायलॉन दोरीने गळा आवळून वडिलांना ठार केले.
Murder वडिलांना ठार मारल्याचे स्वतः आरोपीने सिंदेवाही तालुक्यात राहणार्या मोठा भाऊ पंचशील मेश्राम याला फोन करून सांगितले. त्यामुळे पंचशील भिसीमध्ये दाखल झाला. पंचशील याने तात्काळ भिसी पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. ठाणेदार मंगेश भोंगाडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपी संदेश यास ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र त्याने सुरूवातीला वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले. भोंगाडे यांनी पोलिस खाक्या दाखविताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी संदेश मेश्राम वरूध्द कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.