अक्षरला वगळणे ठरले महाग? पराभवानंतर संघनिवडीवर प्रश्न

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Questions on team selection after defeat दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर आठ फेरीतील सामन्यासाठी भारतीय संघाची अंतिम अकरा जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. उपकर्णधार अक्षर पटेल याला विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने या बदलावर चर्चा सुरू झाली आहे. सामन्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी निवडीमागील विचार स्पष्ट केला. दक्षिण आफ्रिकेच्या वरच्या फलंदाजी क्रमात डावखुऱ्या फलंदाजांचे वर्चस्व असल्याने ऑफ-स्पिनचा पर्याय उपयोगी ठरेल, असा संघ व्यवस्थापनाचा अंदाज होता. क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन आणि डेव्हिड मिलर हे डावखुरे फलंदाज धोकादायक ठरू शकतात, या विचारातून सुंदरला प्राधान्य देण्यात आले. सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांत तो प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा होती.
 

questions-on-team 
 
सांख्यिकीय नोंदी पाहिल्यास सुरुवातीच्या षटकांत डावखुऱ्यांविरुद्ध सुंदरचा यशाचा दर चांगला आहे. परंतु मधल्या टप्प्यात चित्र वेगळे दिसते. त्या टप्प्यात अक्षरची कामगिरी अधिक परिणामकारक ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या एका टप्प्यावर तीन बाद वीस अशी असताना भारताने पकड मजबूत केली होती. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी भागीदारी करत डाव सावरला. मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांना अपेक्षित बळी मिळाले नाहीत आणि प्रतिस्पर्ध्यांनी मोठी धावसंख्या उभी केली. सुंदरला मधल्या टप्प्यात मर्यादित षटके मिळाली आणि त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे जर अक्षर संघात असता तर तो मधल्या षटकांत अधिक प्रभाव टाकू शकला असता, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. अखेरीस दक्षिण आफ्रिकेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत प्रभावी विजय नोंदवला आणि भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित झाले.