मृतकांची संख्या झाली पाच
जिल्हाधिकार्यांकडून विचारपूस
अमरावती,
धारणी तालुक्यातील Ranighat accident राणीघाटामध्ये रविवारी रात्री झालेल्या अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील रिता राठोड यांचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतकांची संख्या आता पाच झाली आहे. उर्वरित जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट घेऊन माहिती घेतली. जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते. अपघातामधील अर्चना दारासिंगे रा. कंजोली, गेरुबाई देवळे रा. मोठेखेडे, रिता राठोड रा. सिनंबद, देवा धांडे, रा. कंजोली, मुनी दहीकर रा. कंजोली, विकेश दहीकर रा. सालाई सर्व ता. धारणी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी येरेकर यांनी सुरवातीला अपघात कक्षातील जखमी भुनी दहीकर यांना भेट दिली. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर अपघातातील अर्चना दारसिंगे या गर्भवती महिलेची भेट घेतली. अपघातामुळे माता व बाळ दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी उपचार करावेत. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना रूग्णालयातून सुट्टी द्यावी, अशा सूचना केल्या.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Ranighat accident अपघातातील बोलेरो पिकअप हे वाहन गोलाई येथील नामदेव सिताराम कातकडे यांच्या नावावर आहे. या वाहनाचा चालक दिपक सज्जुलाल सावलकर (वय ३०, रा. कंजोली) याच्याविरुद्ध धारणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तोच अपघाताला कारणीभूत ठरला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहेत. मेळघाटमध्ये झालेल्या अपघातातील वाहनचालकांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी येरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्या.
खा. वानखडे यांनी दिली भेट
खा. वानखडे यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, मेळघाटातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खराब रस्त्यामुळे अपघातांची मालिका
सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आला होता. मात्र, कंत्राटदार कंपनीने काम अर्धवट सोडल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खडी, गिट्टी आणि डस्ट पसरलेली आहे. घाटमाथ्यावरील वळणदार आणि चढावाच्या रस्त्यावर अशा प्रकारे बांधकाम साहित्य राहिल्याने वाहनांचे संतुलन बिघडत असून अपघातांची शक्यता वाढत आहे.