महिला शेतकरी बेशुद्ध.. शक्तिपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको

    दिनांक :23-Feb-2026
Total Views |
परभणी,
Shaktipeeth Highway protest परभणी-गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटी येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून सलग तीन तास रास्ता रोको करण्यात आला. जमीन मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महामार्गाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले.
 

Shaktipeeth Highway protest  
या आंदोलनात खासदार संजय जाधव यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी शक्तिपीठ महामार्गासाठी देण्यास ठाम नकार दर्शवला. “शेतीवरच आमची उपजीविका अवलंबून आहे. जमीन विकून मिळणाऱ्या पैशातून शेतकरी काय खाणार?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
दरम्यान, आंदोलनात सहभागी Shaktipeeth Highway protest झालेल्या सहजपूर जवळा येथील सीमा बागल या महिला शेतकरी वाढत्या तापमानामुळे बेशुद्ध पडल्या. त्यांना भोवळ येऊन प्रकृती बिघडल्याने तातडीने परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ खळबळ उडाली.जमीन मोजणीदरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सहजपूर जवळा परिसरात शेतकऱ्यांवर अत्याचार झाल्याचा दावा करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी बोलताना खासदार जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. जनतेच्या भावनांचा आदर करून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच ४ मार्च रोजी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.या आंदोलनामुळे परभणी-गंगाखेड मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, प्रशासनाने संयम राखण्याचे आवाहन केले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.