अरे देवा...सोन शोधण्यासाठी गोदावरीत चाळण्या, टोपल्या घेऊन नागरिकांची झुंबड!

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
पैठण,
Crowd of citizens in Godavari पैठणच्या नाथषष्ठीनिमित्ताने नाथ मंदिर परिसराजवळील गोदावरी नदीचे पाणी कमी करण्यात आले आहे. नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडल्यामुळे शेकडो लोक सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी नदीत उतरत आहेत. हातात चाळण्या, टोपल्या घेऊन प्रवाश्यांची ही गर्दी रोज दिसून येत आहे. गोदावरी नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट असून येथे दररोज मृत व्यक्तींच्या विधी नंतर राख आणि इतर साहित्य नदीत विसर्जित केले जाते. या विधीनंतर मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या अंगठ्या, मंगळसूत्र, चांदीचे दागिने अशा वस्तू अनेकदा गाळात सापडतात. स्थानिक लोक पात्राचे पाणी कमी झाल्यावर या वस्तू शोधण्यासाठी गर्दी करतात.
 
 
godawari
शास्त्रोक्त पद्धतीनुसार, व्यक्ती मरण्यापूर्वी मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, कानातले, बांगड्या इत्यादी दागिने कुटुंबीयांकडे ठेवणे योग्य मानले जाते. चितेवर दागिने ठेवले तर ती वितळून नष्ट होतात किंवा राखेत मिसळतात. गरुड पुराण व इतर शास्त्रांनुसार, मृत व्यक्तीच्या तोंडात, नाक, कान, डोळे अशा ठिकाणी सोन्याचे छोटे तुकडे ठेवले जातात, ज्यामुळे आत्म्याला शुद्धी मिळते आणि पुढील यात्रा सुलभ होते. संत एकनाथ महाराजांच्या पवित्र भूमीत असलेल्या पैठण येथे दरवर्षी नाथषष्ठी महोत्सव भव्य रूपात साजरा केला जातो. हा सोहळा आषाढी वारीनंतर राज्यातील दुसरा सर्वात मोठा वारकरी सोहळा मानला जातो. यंदा या ठिकाणी ५ ते ७ लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरीत जलसमाधी घेतली होती. पंचपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी गुरू जनार्दनस्वामी जन्म, दत्तात्रेय दर्शन, एकनाथांना गुरुदर्शन, गुरुपुण्यतिथी आणि एकनाथ जलसमाधि या पाच महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो. यंदा हा सोहळा ९ मार्च ते ११ मार्च २०२६ दरम्यान साजरा होणार आहे.