* पारदर्शकता व सुसूत्रतेपेक्षा दिले बचतीला महत्त्व
* नागपूर विद्यापीठ मात्र अग्रवाल समितीच्या शिफारशीवर ठाम
चंद्रपूर,
Gondwana University उच्च शिक्षणातील परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना दिली जाणारी मुख्य उत्तरपत्रिका ही 32 ते 40 पानांची असावी. शिवाय अतिरिक्त पुरवणी दिली जाऊ नये, असे मागदर्शन अग्रवाल समितीने केले होते. 2025 च्या उन्हाळी परीक्षेपर्यंत या मार्गदर्शक तत्वावर गोंडवाना विद्यापीठाचा विश्वास होता. परंतु, त्यानंतर खर्चात कपात करण्याच्या नावावर या विद्यापीठाने आपली उत्तरपत्रिका 40 हून थेट 20 पानांवर आणली!
Gondwana University चंद्रपुरातील एका महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर गोंडवाना विद्यापीठात जमा उत्तरपत्रिका काढून त्यात अतिरिक्त पुरवणी जोडल्याचा आणि गुणवाढ करवून घेतल्याचा तथाकथित आरोप सध्या गोंडवाना विद्यापीठ प्रशासनावर होत आहे, हे विशेष. महाराष्ट्रातील अकृषक विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित तत्कालीन माहिती व तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काही शिफारसी केल्या होत्या. विद्यार्थ्यांना दिली जाणारी मुख्य उत्तरपत्रिका ही 32 ते 40 पानांची असावी. ही पाने विषयाच्या व्याप्तीनुसार पुरेशी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त पुरवण्या दिल्या जाऊ नये. पुरवण्या जोडताना त्या हरवणे किंवा गहाळ होण्यासारख्या तांत्रिक चुका टाळता याव्या, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि ‘ऑनलाईन असेसमेंट’ प्रक्रिया सोपी आणि वेगवान व्हावी, विद्यार्थ्यांनी फापटपसारा न लिहिता मुद्देसूद उत्तरे लिहिण्यावर भर द्यावा, अशा या शिफारशी होत्या. नागपूर विद्यापीठ अद्यापही या शिफारशी नुसार 40 पानांची उत्तरपत्रिकेचाच वापर करीत असून, ‘नो सप्लिमेंट’ धोरण स्वीकारले आहे.
अग्रवाल समितीने या शिफारसी केल्या असल्या तरी प्रत्येक विद्यापीठ आपल्या अधिकारानुसार यात थोडेफार बदल करण्यास मोकळे होते. त्यामुळे अमरावती व अन्य काही विद्यापीठांनी त्यात बदल केला. अमरावतीत 24 पानांची उत्तरपत्रिका दिली जात असून, गरज पडल्यास 4 पानांची अतिरिक्त पुरवणी ते विद्यार्थ्यांना देतात. गोंडवाना विद्यापीठाने मात्र, उत्तरपत्रिका थेट 20 पानांवर आणली आहे.
1 कोटीचा खर्च आम्ही 30 लाखावर आणलाः पोटदुखे
गोंडवाना विद्यापीठात आधी 40 पानांची उत्तरपत्रिका दिली जात होती. परंतु, ‘बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ने ठरवल्याप्रमाणे आता 20 पानांची उत्तरपत्रिका दिली जाते. असे केल्याने 1 कोटीवर जात असलेला खर्च आता 30 लाखावर आला आहे. गतवर्षीच्या परीक्षेत काही जुन्या उत्तरपत्रिकांचा वापर झाल्याने खर्च 20 लाख आला होता. पण आता सर्वच नव्या उत्तरपत्रिका वापरल्याने 30 लाख एवढा खर्च आला. घेतलेल्या निर्णयाचे काही फायदे असतात आणि काही तोडेही असतात. मला केवळ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्टीकरण विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी तभाला दिले.
परीक्षा व मुल्यांकन सुव्यवस्थित होणे महत्त्वाचेः पोशट्टीवार
शिक्षण व्यवस्थेतील धुरिणांच्या शिफारशी विचापूर्वकच केल्या गेल्या असतील. परीक्षा व मुल्यांकन सुव्यवस्थित व्हावे, त्यात कुठलाही घोळ होऊ नये, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हे पैसे वाचविण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते, असे मत Gondwana University गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप पोशट्टीवार यांनी व्यक्त केले.