आळंदी,
instructions-for-the-ashadhi-wari : आगामी आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी पालखी मार्गावरील सर्व विकासकामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित विशेष आढावा बैठकीत त्यांनी पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आणि सर्व प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी अनिल दौंडे, देहू संस्थानचे विश्वस्त गणेश मोरे, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी देहू ते देहू रोड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्ते रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला आपापल्या हद्दीतील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्वतः पाठपुरावा करणार आहे.
त्याचप्रमाणे देहू येथील मंदिरापर्यंतचा ५०० मीटरचा रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण केला जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे असतो; मात्र जागेची अडचण असल्याने तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त पाहणी केली जाईल. काळभोर नगर ते आकुर्डी दरम्यानचे मेट्रोचे काम पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवली जाणार असून, गवळ्याची उंडवडी, सणसर आणि निमगाव केतकी येथील मुक्कामाच्या जागेचे प्रश्न प्रशासनाकडून सोडविले जातील.