आश्वासनानंतर रस्ता जामला तात्पुरती स्थगिती
किडांगीपारमध्ये प्रशासनाशी चर्चा
ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
आमगाव,
तालुक्यातील Kidangipar : Darumukti किडांगीपार येथे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या रस्ता जाम आंदोलनाला ग्रामस्थांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. गावातील महिला व नागरिकांनी दारू दुकानामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा गंभीर आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला होता. दारूमुळे कुटुंबांमध्ये कलह, तरुण पिढीचे बिघडते भविष्य आणि गावातील शांततेवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Kidangipar : Darumukti यापूर्वी तहसील कार्यालय आमगाव तसेच संबंधित विभागांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रस्ता जाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, प्रशासनाने तातडीने हालचाल करत तहसीलदार मोनिका कांबळे, पोलिस निरीक्षक तिरुपती राणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग देवरीचे अधिकारी आदित्य शेडमाके व सहकार्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. सहा जणांचे शिष्टमंडळ तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे बैठक घेऊन दारू दुकानाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. या चर्चेनंतर परिसरातील तणावपूर्ण वातावरण काहीसे निवळले असून आंदोलन सध्या स्थगित ठेवण्यात आले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नाही, ठोस निर्णय न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या वेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.