*शासनाची अधिसूचना जारी, तपासाच्या अडचणी होणार दूर
*किडनी विक्री प्रकरण
चंद्रपूर,
kidney sale case किडनी विक्री प्रकरणी चंद्रपूर पोलिसांच्या ‘एसआयटी’कडे असलेल्या तपासात तांत्रिकद्दष्ट्या काही अडचणी येत होत्या. पोलिसांना याबाबतीत तपास करण्याचा अधिकार आहे का, असा युक्तीवाद न्यायालयात आरोपींच्या वकिलांकडून केला जात होता. त्यावर उपाय म्हणून आता ‘थोटा’अंतर्गत होणारा तपासही अधिकृतपणे ‘एसआयटी’कडे सोपवण्यात आला आहे. तशी शासनाची अधिसूचना जारी झाली आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील अवैध सावकारी प्रकरणाच्या तपासातून किडनी तस्करी प्रकरण उघकीस आले. ते देशव्यापी असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने त्यास मोठे महत्त्व आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू असताना, दिल्लीतील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याच्या वकिलाकडून ‘थोटा’ (मानवी अवयव प्रत्यारोपण) कायद्यांतर्गत पोलिसांना तपास करण्याचे अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यानंतर एसआयटी प्रमुख तथा अपर पोलिस अधीक्षकांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. आता शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार ‘थोटा’ अंतर्गत तपास करण्याचे संपूर्ण अधिकार पोलिसांना बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.
kidney sale case किडनी तस्करी प्रकरणात आतापर्यंत मुख्य एजंट रामकृष्ण सुंचू तथा कृष्णा, मोहालीतील डोनर हिमांशू भारद्वाज व ब्रह्मपुरीतील सहा अवैध सावकारांना अटक करण्यात आली आहे. तर तामीळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टार किम्स रुग्णालयातून हा व्यवसाय होत असल्याचे एसआटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. रवींद्रपाल सिंग व त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी संशयित म्हणून पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. दरम्यान, डॉ. सिंगचा अटकपूर्व जामीन चंद्रपूरच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्याने धाव घेतली. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून, सरकारी वकिल व डॉ. सिंगच्या वकीलांकडून युक्तीवाद केला जात आहे. त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामीला तामीळनाडूतील हायकोर्टाने ‘ट्रांझीट रिमांड’ दिला असून, 5 फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, डॉ. गोविंदस्वामी हजर झाला नाही.
डॉ. सिंगच्या जामीन प्रकरणी 4 मार्चला सुनावणी
डॉ. रवींद्रपाल सिंग याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात यापूर्वीही सुनावणी झाली असून, 23 व 24 फेब्रुवारीला चंद्रपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी व मंगळवारी डॉ. सिंग चंद्रपूर पोलिसांसमोर हजर झाला. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नावर त्याने चक्कार शब्द काढला नसल्याची माहिती एसआयटीचे सदस्य तथा एलसीबीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. मंगळवार, 24 फेब्रुवारीला त्याच्या जामीन प्रकरणी सुनावणी झाली असून, पुढची सुनावणी आता 4 मार्चला होणार आहे.