तारिक रहमान यांचा पहिला परदेश दौरा मुस्लिम देशात!

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
ढाका,
Tariq Rahman's visit to Muslim countries बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या पहिल्या परदेश दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. प्रथेनुसार बांगलादेशचे पंतप्रधान पहिली अधिकृत भेट भारताला देतात, मात्र यावेळी तसे होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, रहमान हे उमरा करण्यासाठी सौदी अरेबियाला जाऊ शकतात.
 
 
tarique rahman
 
हा संभाव्य दौरा केवळ धार्मिक कारणापुरता मर्यादित नसून नव्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाची दिशा दर्शवणारा मानला जात आहे. अलीकडेच सौदी अरेबियाच्या राजदूतांनी ढाका येथे पंतप्रधानांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या दौऱ्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. दरम्यान, भारतने नव्या बांगलादेश सरकारशी सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी ढाक्यातील भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. परस्पर हितसंबंध आणि सामायिक फायद्यांच्या आधारे सर्व क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यास नवी दिल्ली उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
तारिक रहमान यांनी १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सुमारे सतरावर्षांच्या निर्वासनानंतर ते डिसेंबर २०२५ मध्ये मायदेशी परतले होते. अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्याकडे आणि त्यातून भारत-बांगलादेश संबंधांना कोणती नवी दिशा मिळते, याकडे प्रादेशिक राजकारणाचे लक्ष लागले आहे.