भारत मंडपम निषेध प्रकरणी उदय भानू चिब अटकेत

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Uday Bhanu Chib arrested दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या निषेध प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक केली आहे. एआय परिषदेदरम्यान झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे. चिब यांना अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. पटियाला हाऊस न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. न्यायालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.
 
 
उदय भानू चिब
 
या अटकेवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या कारवाईचा निषेध करत युवक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप केला. लोकशाही व्यवस्थेत तरुणांना प्रश्न विचारण्याचा आणि शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. बघेल यांनी सामाजिक माध्यमावर लिहिताना सरकार लोकशाहीचा गाभा असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करत असल्याचा आरोप केला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणताही हिंसाचार न करता आपला आवाज मांडला, असे ते म्हणाले. अटक करण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करून त्यांच्यावरील आरोप मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून कायदेशीर प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे.