अवकाळी सरींनी शेतकर्‍यांत धास्ती

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
गोंदियासह पूर्व विदर्भात ‘यलो अलर्ट’
रब्बी, भाजीपाला व आंबा पिकांवर संकट

गोंदिया, 
Unseasonal rains  सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर मंगळवारीही दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत तुरळक सरी बरसल्या. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके घेणार्‍या शेतकर्‍यांसह बागायतदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. विशेषतः भाजीपाला व आंबा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून हवामान विभागाकडून गोंदियासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
 
 
fasal
 (संग्रहित छायाचित्र )
 
Unseasonal rains  सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच हवामानात अचानक बदल होत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. गोंदियासह गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, सालेकसा आदी तालुक्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी सरी कोसळल्या. या पावसाचा धान पिकाला काही प्रमाणात लाभ होण्याची शक्यता असली तरी रब्बी पिके व आंबा बागांना फटका बसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरणानंतर काही वेळ ऊन पडले; मात्र दुपारनंतर पुन्हा ढग दाटून येत वातावरणात गारवा निर्माण झाला. या ढगाळ हवामानाचा सर्वाधिक परिणाम भाजीपाला व कडधान्य पिकांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सातत्याने बदलणार्‍या वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तासांत विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गोंदियासह भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.