अभिषेक शर्माचे स्थान धोक्यात? सराव सत्रानंतर चर्चांना उधाण

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Abhishek Sharma's position is in danger २०२६ च्या टी-२० विश्वचषकात विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानल्या गेलेल्या भारतीय संघासमोर सध्या मोठे आव्हान उभे ठाकले आहे. स्पर्धेच्या महत्त्वाच्या टप्प्यात फलंदाजांची सातत्याने होणारी अपयशी कामगिरी संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. विशेषतः सलामीवीर अभिषेक शर्मा अपेक्षित योगदान देऊ न शकल्याने संघ व्यवस्थापन अडचणीत आले आहे. त्याला अंतिम अकरातून वगळले जाईल की फलंदाजीच्या क्रमात बदल केला जाईल, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
 
 

abhishek 
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर आठ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुढील फेरीची आशा कायम ठेवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे संघासाठी अत्यावश्यक बनले आहे. चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्राने मात्र संघरचनेबाबत नवे संकेत दिले आहेत. सरावादरम्यान संजू सॅमसन इशान किशनसोबत प्रमुख जाळ्यात फलंदाजी करताना दिसला. सामान्यतः ज्या क्रमाने फलंदाज सामन्यात उतरतात त्याच पद्धतीने सराव केला जातो. त्यामुळे अभिषेकच्या स्थानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच वेळी अभिषेक गोलंदाजी करताना दिसल्याने त्याच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिलक वर्माही सुरुवातीच्या सत्रात सराव करताना दिसला, मात्र अभिषेक नंतर स्वतंत्रपणे फलंदाजीसाठी उतरला आणि मुख्य गोलंदाजांऐवजी प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांचा सामना करत होता.
 
स्पर्धेत आतापर्यंत अभिषेकला चार डावांत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. तीन वेळा तो शून्यावर बाद झाला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने केवळ १५ धावा केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका वाढली आहे. तरीही त्याला पूर्णपणे बाहेर बसवण्याची शक्यता कमी मानली जात असली, तरी फलंदाजीच्या क्रमात बदल होऊ शकतो. तिलक वर्माला विश्रांती देऊन संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते, तसेच सलामीची जोडीही बदलण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील सामना भारतीय संघासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.