उद्या चिमूरच्या वारजूकर बंधुंचा भाजपात प्रवेश

* काँगे्रसच्या गटबाजीचा आला होता कंटाळा

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
चंद्रपूर,
chimurs-warjukar-brothers-join-bjp : काँग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळून चिमूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर तथा विधानसभेचे उमेदवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर गुरूवार, 26 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणार आहेत. वारजूकर बंधूंनी फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया होते.
 

J 
 
वारजूकर बंधूंनी घेतलेल्या या निर्णयामुळे एकीकडे जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली, तर दुसरीकडे भाजपा आमदार किर्तीकुमार भांगडीया व वारजूरकर बंधू एकत्र येणार असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार आहे.
 
 
 
डॉ. अविनाश वारजूकर एकेकाळी काँगे्रसचा मोठा चेहरा होते. ते चिमूर विधानसभा मतदार संघाचे आमदारही राहिले. तर डॉ. सतिश वारजूकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले आहेत. पण 2019 व 2024 अशा सलग दोन निवडणुकीत चिमूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. सतिश वारजूकर पराभूत झाले. त्यानंतर पक्षात त्यांचा वावर कमी दिसला. विधानसभा निवडणुकीत सातत्याने होत असलेला पराभव आणि काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे ते कंटाळले होते. शेवटी दोन्ही भावांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या द्दष्टीने ही मोठी घडामोड मानली जात आहे.
 
मुंबईत होणार पक्षप्रवेशः डॉ. सतिश वारजूकर
 
 
बुधवारी मुंबईत आम्ही संपूर्ण वारजूकर कुटूंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. गुरूवार, 26 फेब्रुवारी रोजी भाजपच्या मुंबई कार्यालयात आमचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार असल्याचे डॉ.वारजूकर यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षाचा काँगे्रसचा आलेख बघता, येत्या काळातही ही गटबाजी वाढत जाणार आहे. महापालिकेतील नगरसेवक ज्याप्रमाणे धानोरकर व वडेट्टीवार गटात विभागले गेले, तशीच स्थिती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही बघायला मिळणार आहे. त्यामुळे या पक्षात आता भविष्य नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही वारजूकर बंधू भाजपात प्रवेश घेणार असल्याचे ते म्हणाले.