शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा : आकाश वर्मा

मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वाशीम, 
akash-verma : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नागरिकांना योजनांची अचूक माहिती मिळाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो, असे प्रतिपादन परिविक्षाधीन अधिकारी तथा कारंजा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांनी केले.
 


jlk
 
 
 
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, गटविकास अधिकारी पुनम राणे,जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे-राऊत तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी वर्मा म्हणाले की, शासनाच्या योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनासारखे उपक्रम जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरतात आणि नागरिकांमध्ये योजनांबाबत विश्वास निर्माण करतात. समाजातील अनुसूचित जाती, मागासवर्गीय तसेच दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
उपजिल्हाधिकारी कैलास देवरे म्हणाले की, शासनाच्या योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल. पुढे देवरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करणे हा असून, नागरिकांना विविध महसूल विषयक सेवा सुलभ, जलद व वेळेत उपलब्ध करून देणे हे आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान उपस्थित मान्यवर , अधिकारी कर्मचारी यांनी प्रदर्शनीची पाहणी केली.
 
 
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले, तर आभार जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे-राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू जाधव, रुपेश सवाई, अनिल कुरकुटे आणि प्रमोद राठोड, कारंजा पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचार्‍यांसह जितेंद्र बारड यांनी पुढाकार घेतला.