वर्धा,
jaljeevan-mission-work : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या जलऊर्जा मंत्रालयांतर्गत जलजीवन मिशन अभियान सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ८३९ प्रकल्प पूर्ण करायचे होते. त्यापैकी ५२७ प्रकल्प पूर्ण झाले असून १४८ प्रकल्प ७५ ते ९९ टकेच पूर्ण झाले आहेत. अद्यापही निधीअभावी १६४ प्रकल्प रखडल्याची माहिती पुढे आली आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जलजीवन मिशन अभियानाला २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या जलऊर्जा मंत्रालयाने मान्यता दिली होती. या योजनेचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळ जोडणी देणे आणि २०२५ पर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दररोज ५५ लिटर स्वच्छ पाणीपुरवठा करणे हे होते. ही योजना २०२३ मध्ये जिल्ह्यात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ८३९ कामे मंजूर करण्यात आली होती. यासाठी ३९४ कोटी रुपयांचा निधी मागण्यात आला. पहिल्यांदा १९८ कोटी रुपये व त्यानंतर २७ कोटी याप्रमाणे २२५ कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीतून ५२७ कामे पूर्ण करण्यात आली तर १४८ कामे प्रगतीपथावर आहेत. निधीअभावी अद्यापही १६४ कामे रखडली आहेत. या प्रकल्पांसाठी ८२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून सरकारकडून निधीच मिळाला नाही.
या योजनेअंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित कामांसाठी ८२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारकडून लवकरच निधी येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर कंत्राटदारांचे बिल दिले जाणार असून उर्वरित १६४ कामेही मार्गी लागतील, अशी प्रतिक्रीया कार्यकारी अभियंता डी. एस. परांडे यांनी बोलताना दिली.