शरद पवारांना हिंगोलीत धक्का; आतिश दांडेगावकर ६०० कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
हिंगोली,
Join BJP with 600 workers राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड हिंगोलीत घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कुटुंबातच आता राजकीय फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांच्या सुपुत्र आतिश दांडेगावकर यांनी सुमारे ६०० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
 
 
 
sharad pawar
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ दांडेगावकर कुटुंब राष्ट्रवादी विचारसरणीशी एकनिष्ठ राहिले आहे. जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद भूषवले असून पक्षात त्यांचा प्रभावी आवाज मानला जातो. मात्र त्यांच्या मुलाने वेगळा राजकीय मार्ग स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. वडील राष्ट्रवादीत आणि मुलगा भाजपमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याने हिंगोलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
 
 
भाजपमध्ये प्रवेश करताना आतिश दांडेगावकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले. राज्याच्या आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी भाजपचे धोरण अधिक प्रभावी असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे जयप्रकाश दांडेगावकर हे अजूनही शरद पवार यांच्यासोबत ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीचा पुढील काळात स्थानिक पातळीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलनीकरणाच्या चर्चांना आधीच उधाण आले असताना या प्रवेशामुळे पक्षातील अंतर्गत स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हिंगोलीतील या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणते नवे राजकीय समीकरण तयार होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.