मार्कंडा देवस्थानाची विकासकामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

*आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश *14.85 कोटींच्या कामांसाठी अंमलबजावणी करण्याच्या सूचना

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
चंद्रपूर, 
sudhir-mungantiwar : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिवमंदिराच्या संवर्धन व परिसर विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ही विकासकामे मिशन मोडवर राबवून 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
jk
 
 
 
या संदर्भात मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास ‘मिशन मोड’वर करण्याची गरज अधोरेखित केली. राज्य पुरातत्व विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत विदर्भातील संरक्षित स्मारके, ऐतिहासिक स्थळे, स्मृतिचिन्हे, मंदिरे तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी मंजूर 14 कोटी 85 लक्ष रुपयांच्या कामांची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी विदर्भातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 
 
 
कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही समिती दर आठवड्याला प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा आढावा घेणार आहे. तसेच केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना गडचिरोलीतील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी निमंत्रित करण्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
देवस्थान परिसरातील 100 मीटर व 30 मीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम अथवा अतिक्रमण होऊ नये यासाठी गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी स्थानिक ग्रामसेवकांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, विकासकामे दोन टप्प्यांत होणार असताना दुसर्‍या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यता व निधी मागणीसाठी झालेल्या तीन वर्षांच्या विलंबाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला या बैठकीत देण्यात आले.
 
 
या बैठकीला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. श्री मार्कंडा शिव मंदिराचा विकास हा केवळ धार्मिक स्थळापुरता मर्यादित नसून, गडचिरोलीच्या सांस्कृतिक ओळखीला बळकटी देणारा आणि पर्यटनवृद्धीस चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.