मनरेगा निधी अपहारप्रकरणी १८९६ पानांचे दोषारोपपत्र

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
mnrega-fund-embezzlement-case : आर्वी पंचायत समितीत उघड झालेल्या मनरेगा निधी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी प्रणाली कसर यांच्याविरुद्ध तब्बल १८९६ पानांचे दोषारोपपत्र छाननीअंती आर्वी येथील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या खटल्यात बडतर्फ मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दोषी ठरल्यास आरोपीला किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
 
 
 
jk
 
 
 
आर्वी पंचायत समितीत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर ते मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अशी जबाबदारी सांभाळताना बडतर्फ एपीओ प्रणाली कसर यांनी शासनाचा ५० लाखांहून अधिकचा निधी टप्प्याटप्प्याने आपल्या बँक खात्यात वळता केला. तसेच नातेवाईक व इतरांच्या बँक खात्यातही शासकीय निधी वळता करून शासनाच्या निधीचा मोठा अपहार केला. गटविकास अधिकारी व जिल्हास्तरीय समितीने या प्रकरणी चौकशी केल्यावर आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यावर कसरला अटक करण्यात आली. सध्या ती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आर्वी ठाण्याकडून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते झाले. जानेवारी महिन्यात या प्रकरणाच्या तपासाला सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गती देत मुख्य आरोपी प्रणाली कसर यांच्याविरुद्ध १९०० पानांच्या दोषारोपपत्राला अंतिम रुप दिले. छाननीअंती काही कागदपत्रे वगळल्यावर कसरविरुद्ध अखेर १८९६ पानाचे दोषारोपपत्र २० फेब्रुवारी रोजी आर्वी येथील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात दोषसिद्धीसाठी महत्त्वाचे ठरणारे बँक स्टेटमेंट, सुमारे ३५ व्यतींचे बयाण आदींचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
उपजिल्हाधिकारी (रोहयो)कडून माहिती प्राप्त झाल्यावर मुख्य आरोपी प्रणाली कसर यांच्याविरुद्धचे दोषारोपपत्र आर्थिक गुन्हे शाखेने आर्वीच्या न्यायालयात दाखल केले आहे. आता या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती देत इतर आरोपींनाही अटक करण्याचा सपाटा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून लावला जाणार आहे. या गुन्ह्यात सहभागी शासकीय अधिकारी आणि प्रणाली कसर यांनी ज्यांच्या बँक खात्यात शासकीय निधी वळता केला ते आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर राहणार आहे.