रेमंड कंपनीतील कामगारांचा प्रश्न मंत्र्यांच्या दारी

आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतली कामगार मंत्र्यांची भेट

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
balasaheb-mangulkar : यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या उपोषणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी मुंबई येथे कामगार कल्याण मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
 
 
 
y25Feb-Mangulkar
 
 
 
यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी आ. मांगुळकर यांनी केली. रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगार गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि वेतनाच्या प्रश्नावरून उपोषणाला बसले आहेत.
 
 
या आंदोलनामुळे कामगारांमध्ये असंतोष असून उद्योगावरही याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी मंत्रालयात थेट कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली.
 
 
या भेटीदरम्यान आ. मांगुळकर यांनी मंत्र्यांना अवगत केले की, कंपनीतील कामगारांचे वेतन आणि इतर कायदेशीर हक्कांंचे प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. कामगारांच्या या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त बैठकीचे नियोजन
 
 
आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी विनंती केली की, कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात तातडीने एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. कामगारांचे हित अबाधित ठेवत उद्योगही सुरळीतपणे चालणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सामंजस्याच्या भूमिकेतून लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
 
 
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आ. मांगुळकर यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत, या प्रकरणात शासन स्तरावरून सकारात्मक हस्तक्षेप करण्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेऊन हा पेच लवकरात लवकर सोडवला जाईल, असे संकेतही मंत्र्यांनी दिले. या भेटीमुळे आता रेमंड कंपनीतील कामगारांच्या आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.