रोहित पवार, अमोल मिटकरी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Rohit Pawar aggressive at the police station मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राज्याचे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांशी जोरदार तणावपूर्ण बाचाबाची केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात पुरावे असूनही पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी ठाण्यात उपस्थित केला. या प्रसंगी पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दोन्ही नेत्यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला असून या प्रकरणात फक्त चौकशी किंवा आश्वासन पुरेसे नाही, त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे रोहित पवार यांनी पोलीसांना सांगितले. त्यांनी दावा केला की डीजीसीएच्या अहवालानुसार व्हीएसआर कंपनीची निष्काळजी स्पष्ट झाली आहे आणि त्यांचा मेंटेनन्स तसेच सुरक्षा नियम पाळण्यात अपयश ठरले आहे.
 
 

rohiot 
 
त्यामुळे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचा गुन्हा या दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांविरोधात दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले होते, तर पोलीस ठाण्यात केवळ आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या वकिलांसह पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे उपस्थित होते. नेत्यांनी पोलिसांना धारेवर धरत विचारले की, “राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू झाला, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर का दाखल करत नाहीत? विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावाखाली काम करत आहेत का?”
 
अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. “एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस फक्त चौकशीचे नाव सांगत वेळ काढत आहेत,” असे ते म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे तातडीने पोलीस ठाण्यात दाखल झाले. उपायुक्त मुंढे यांनी नेत्यांना आश्वासन दिले की, योग्य ती कारवाई कायद्याच्या चौकटीतून केली जाईल; मात्र, रोहित पवार यांनी फक्त तक्रार अर्ज पुरेसा नाही, त्वरित गुन्हा दाखल करावा, असे ठामपणे सांगितले. या घटनेमुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी न्यायालयीन कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे घटनास्थळी तैनात राहून प्रकरणाचा तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.