अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरा

समाज कल्याण विभागाचे आवाहन 2,468 अर्ज प्रलंबित

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
post-matric-scholarship-applications : जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.
 
 
 
jlk
 
 
 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. यात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती या योजनांचा समावेश आहे.
 
 
2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 30 जून 2025 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. मागील 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 10 हजार 649 अर्ज नोंदणीकृत झाले होते. त्यापैकी चालू 2025-26 वर्षात आतापर्यंत 8 हजार 785 अर्ज नोंदणीकृत झाले असून हे प्रमाण 82.49 टक्के इतके आहे.
 
 
या अर्जांपैकी 2 हजार 468 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. विहित कालावधीत अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर न केल्यास व त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाची सर्वस्वी जबाबदारी राहील. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या महाविद्यालयांचे सन 2025-26 वर्षासाठी शुल्क मंजूर झालेले नाही, त्यांनी पालक विभागाकडे पाठपुरावा करून शुल्क मंजुरीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचनाही समाज कल्याण विभागाने दिल्या आहेत.